ऑफिस बॉय
एकदा एक मुलगा जेमतेम १० वी शिकलेला आणि गरीब परिस्थितीत वाढलेला ‘ऑफिस बॉय’ या
पदासाठी एका कंपनीमध्ये मुलाखतीसाठी गेला. तिथे त्याची स्वच्छता चाचणी घेण्यात आली.
स्वच्छता चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची मुलाखत घेतली गेली. मुलाखतीमध्ये
सर्व प्रश्नांची त्याने समाधानकारक उत्तरे दिली.
शेवटी मुलाखतकाराने त्याला संपर्कासाठी म्हणून
त्याचा ई-मेल आय-डी विचारला. तर तो म्हणाला, माझ्याकडे ई-मेल आय-डी नाही. मग तो
मुलाखतकार त्याला म्हणाला, “मग ही
नोकरी आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही.”
तो मुलगा हताश मनाने घरी
जाऊ लागला. जाताना वाटेत त्याला त्याच्या गावचा बाजार दिसला. त्या बाजारात
त्याला एक म्हातारा डोक्यावर टोमाटोची टोपली घेऊन जाताना दिसला. त्याने विचार केला
कि, “आपल्याला काही कंपनीतली नोकरी झेपायची नाही.
त्यापेक्षा आपण बाजारात असे टोमाटो विकलेलेच बरे...”
असा विचार करून त्याने दर
आठवडी बाजारामध्ये थोडे थोडे टोमाटो विकायला सुरुवात केली. त्याला मग हळूहळू थोडा
थोडा नफा होऊ लागला. मग त्याने त्या टोमाटोच्या व्यवसायातच जम बसवला. अशा प्रकारे
प्रत्येक बाजारात तो टोमाटो विकून आपले पोट भरत होता.
एक दिवस तो या टोमाटोच्या
व्यवसायाचा मोठा व्यापारी झाला. त्याचे टोमाटो जगात निर्यात होऊ लागले. अशा
प्रकारे तो एक यशस्वी उद्योजक झाला.
मग
त्याच्या मुलाखतीसाठी काही पत्रकार लोक त्याच्याकडे आले. पत्रकारांनी त्याला खूप
प्रश्न विचारले. मग त्यातीलच एक पत्रकार उठला आणि म्हणाला, “साहेब, तुम्ही एवढे मोठे उद्योजक झाला. मग युवा
पिढीला तुमच्यापर्यंत पोचता यावं म्हणून तुमचा ई-मेल आय-डी
द्यावा.” तो
प्रामाणिकपणे म्हणाला, “माझ्याकडे
ई-मेल आय-डी नाही.” सर्व
पत्रकारांना आश्चर्य वाटले. एवढा मोठा उद्योजक आणि याच्याकडे स्वतःचा ई-मेल आय-डी
नाही. मग पत्रकारांनी उत्सुकतेपोटी विचारले. “मग तुम्ही एवढे उद्योजक कसे झालात ?” तो म्हणाला, “हा ई-मेल आय-डी नाही, म्हणून तर इतका मोठा यशस्वी
उद्योजक आणि व्यापारी झालो. नाही तर ई-मेल आय-डी असता तर, कुणाची तरी चाकरी करीत
बसलो असतो. तुम्हाला हा एवढा मोठा यशस्वी उद्योजक आणि व्यापारी इथं दिसलाच नसता.”
No comments:
Post a Comment