Pages

Friday, June 14, 2013

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन्‌ जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मुर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेज:कण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला धृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारुन दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परि दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारुन येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन्‌ शले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रुपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्‌
मला ज्ञात मी एक धुलि:कण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

कुसुमाग्रज.

Monday, June 4, 2012


ऑफिस बॉय
 एकदा एक मुलगा जेमतेम १० वी शिकलेला आणि गरीब परिस्थितीत वाढलेला ऑफिस बॉय या पदासाठी एका कंपनीमध्ये मुलाखतीसाठी गेला. तिथे त्याची स्वच्छता चाचणी घेण्यात आली. स्वच्छता चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची मुलाखत घेतली गेली. मुलाखतीमध्ये सर्व प्रश्नांची त्याने समाधानकारक उत्तरे दिली.

शेवटी मुलाखतकाराने त्याला संपर्कासाठी म्हणून त्याचा ई-मेल आय-डी विचारला. तर तो म्हणाला, माझ्याकडे ई-मेल आय-डी नाही. मग तो मुलाखतकार त्याला म्हणाला, मग ही नोकरी आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही.
तो मुलगा हताश मनाने घरी जाऊ लागला. जाताना वाटेत त्याला त्याच्या गावचा बाजार दिसला. त्या बाजारात त्याला एक म्हातारा डोक्यावर टोमाटोची टोपली घेऊन जाताना दिसला. त्याने विचार केला कि, आपल्याला काही कंपनीतली नोकरी झेपायची नाही. त्यापेक्षा आपण बाजारात असे टोमाटो विकलेलेच बरे...
असा विचार करून त्याने दर आठवडी बाजारामध्ये थोडे थोडे टोमाटो विकायला सुरुवात केली. त्याला मग हळूहळू थोडा थोडा नफा होऊ लागला. मग त्याने त्या टोमाटोच्या व्यवसायातच जम बसवला. अशा प्रकारे प्रत्येक बाजारात तो टोमाटो विकून आपले पोट भरत होता.
एक दिवस तो या टोमाटोच्या व्यवसायाचा मोठा व्यापारी झाला. त्याचे टोमाटो जगात निर्यात होऊ लागले. अशा प्रकारे तो एक यशस्वी उद्योजक झाला.
            मग त्याच्या मुलाखतीसाठी काही पत्रकार लोक त्याच्याकडे आले. पत्रकारांनी त्याला खूप प्रश्न विचारले. मग त्यातीलच एक पत्रकार उठला आणि म्हणाला, साहेब, तुम्ही एवढे मोठे उद्योजक झाला. मग युवा पिढीला तुमच्यापर्यंत पोचता यावं म्हणून तुमचा ई-मेल आय-डी द्यावा. तो प्रामाणिकपणे म्हणाला, माझ्याकडे ई-मेल आय-डी नाही. सर्व पत्रकारांना आश्चर्य वाटले. एवढा मोठा उद्योजक आणि याच्याकडे स्वतःचा ई-मेल आय-डी नाही. मग पत्रकारांनी उत्सुकतेपोटी विचारले. मग तुम्ही एवढे उद्योजक कसे झालात ? तो म्हणाला, हा ई-मेल आय-डी नाही, म्हणून तर इतका मोठा यशस्वी उद्योजक आणि व्यापारी झालो. नाही तर ई-मेल आय-डी असता तर, कुणाची तरी चाकरी करीत बसलो असतो. तुम्हाला हा एवढा मोठा यशस्वी उद्योजक आणि व्यापारी इथं दिसलाच नसता.

Tuesday, May 29, 2012

सौमित्र ( किशोर कदम )
आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत ,
पण कुठलं ओझ घेउन परततो हा रोज रात्री?
आईला वाटत असेल कुणास ठाउक काय करतो, कुठे असतो दिवसभर?
काय काय भरून नेतो जाते वेळी?
पुस्तक, पेन, कोरे कागद, न्यापकिन, पेस्ट, टूथब्रश, औषध कुठली,
परवा तर अंडरवेअर भरून घेतली बॅगेत त्याने जणू तो परतणारच नाहीये रात्री घरी
विचारावं म्हणून पुढे व्हावं तर घाई घाईत काहीतरी शोधायला लागतो 
कधी कधी बाहेर पडून नाक्यावरून परत येतो
उघडतो कपाटं, फोडतो कुलपं, पुस्तकं धुंडाळतो, खीसे चाचपतो उद्विग्नपणे
घरात त्याच काय हरवलय आणि कधी काही कळत नाही
प्रश्न घेउनच बाहेर पडतो तेव्हा हरवलेलं सापडलयं की नाही हेही पुन्हा समजत नाही
कधी तरी अवचीत संध्याकाळीच परततो ,
गप्प, मलूल बसून राहतो, मला पाहतो तेव्हा पाहतो मलाच अस बिलकूल वाटत नाही
काय झालय रे तुला अस विचारावस वाटत पण निसटल्यागत पिंज-यामधून भुर्र दिशी उडून जातो,
जेव्हा परततो, मध्यरात्रीचा प्रहर मंदपणे सरकत असतो त्याच्या माझ्या वयावरून
उपास, तापास, पूजा, अर्चा सांगुन कधी केली नाही
पण हल्ली लाईट घालवून कळोखात हात जोडून काही तरी पुटपुटताना दिसतो
आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातां सोबत ,
                                                                                   - सौमित्र ( किशोर कदम )

Monday, May 28, 2012

'नजर' त्याची आणि तिची...

खूप दिवसांनी सलग दोन दिवस सुट्टी मिळाल्याने ती आणि तो महाबळेश्वरला फिरायला गेले होते. दिवसभर दोघांनीही खूप धमाल केली. मक्याची गरम कणसे खाल्ली, घोड्यावर बसले. सुट्टी असल्याने प्रवासी जोडप्यांची चांगलीच गर्दी होती. संध्याकाळ होऊ लागली, तसे सर्वजण 'सनसेट' पाईंटकडे मोक्याची जागा पकडण्यासाठी जाऊ लागले. ही दोघंही चालत चालतंच तिकडे गेली आणि वेळेवर तिथे पोहोचली.
दूरवर दिसणा-या डोंगररांगा आणि त्याच्या पाठीमागे लपण्यासाठी चाललेला तो सोन्याचा गोळा. ती त्या दृश्यामध्ये पूर्ण हरवून गेली. 'किती सुंदर.... मला इथेच कायमचं रहावसं वाटतंय.' निसर्गाच्या त्या रमणीय दर्शनाने ती वेडावून गेली होती. त्याचा हात तिने घट्ट पकडून ठेवला होता आणि शाळेत पाठ केलेली बालकवीची निसर्ग कविता ती त्याला ऐकवत होती. मावळत्या सूर्याने डोंगर शिखराला स्पर्श केला आणि तो हळूहळू खाली जाऊ लागला. त्या अद्भुत दृश्याचा आनंद 'तो' ही घेत आहे ना हे पाहण्यासाठी तिने त्याच्याकडे पाहिले आणि तिचा चांगलाच हिरमोड झाला. त्याचे तिच्या कवितेकडे आणि समोरच्या सूर्याकडेही अजिबात लक्ष नव्हते. 
सूर्यास्त पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतल्या तरुण चंद्रीकाना पाहण्यात 'तो' पूर्णपणे तल्लीन झाला होता. तिने त्याला ढोसले, "अरे लक्ष कुठे आहे तुझं ?" तो पटकन त्याच्या तंद्रीतून बाहेर आला. "अगं हे काय, सुर्यास्तच पाहतो आहे मी. किती सुंदर आहे नाही ?" "कोण ?" तिनं फणका-यानेच विचारले. 


असे का घडते ?

        ब-याच पुरुषांची नजर स्त्री सौंदर्याचा नकळत वेध घेत असते. सुंदर स्त्रियांनाही त्याची जाणीव असते आणि त्यांना अशा नजरा खेचून घेणे आवडतेही ! मुलगा वयात येऊ लागला कि त्याला सुंदर मुलींना न्याहाळावे असे वाटू लागते. हा त्याच्या शरीरातील वाढत्या 'टेस्टेस्टेरॉन' या लैंगिक हार्मोनसचा परिणाम असतो आणि हा परिणाम वार्धक्य आले तरी कायम टिकून राहतो.  स्त्रियांना मात्र एखाद्या पुरुषाचे शारीरिक सौंदर्य निरखून पाहावे, असे फारसे वाटत नाही. त्या त्यांच्या आवडत्या व्यक्तीकडे कटाक्ष टाकतात; पण ते तिरपे आणि चोरटे ! त्यामुळेच दोन अनोळखी जोडपी रस्त्यावरून एकमेकासमोरून चालत गेली, तर एका जोडप्यातील दोघांचीही नजर दुस-या जोडप्यातील स्त्रीकडेच जाते. एक स्त्री दुस-या स्त्रीकडे इतकी निरखून पाहते कि तेवढे पुण्यातले पेन्शनरही पाहत नाहीत, हा पुलंचा विनोद सूक्ष्म निरीक्षणावरच आधारलेला आहे. 'ती' दुस-या स्त्रीकडे पाहते; पण तिचं सौंदर्य पाहण्यासाठी नाही. तर तिची साडी किंवा ड्रेस पाहण्यासाठी. त्याच्या दृष्टीने मात्र निसर्गाचा सर्वात सुंदर आविष्कार म्हणजे तरुण स्त्री. त्यातील वैविध्य पाहण्यात तो गुंग होतो. या पाहण्यात वासना किंवा अभिलाषा असेलच असे नाही. तिला मावळता सूर्य दिसतो तशा त्याला तरुण चंद्रिका अधिक सुंदर वाटतात इतकेच !